नांदेड :- राज्यात जेव्हा शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले त्यावेळी बहुमत चाचणी घेण्यात आली. या चाचणीच्या वेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह तीन आमदार सभागृहात उशिरा पोहोचले, त्यामुळे ते मतदान करु शकले नाही. दरम्यान, त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाठिशी असणाऱ्या अदृश्य हातांचे आभार मानले होते.

यासर्व घडामोडींनंतर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसने अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे चव्हाण नाराज असल्याचे म्हटले जात होते. अशोक चव्हाण यांची पक्षात कोंडी होत असल्याने ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा नांदेडमध्ये रंगली होती.

यासर्व चर्चांना अशोक चव्हाण यांनी स्वत:च पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, मी भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत. मी पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असे ट्वीटही चव्हाण यांनी केले आहे.
दुसरीकडे शिवसेना खासदास संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही अशोक चव्हाण यांनी निषेध केला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, राजकारणाचा स्तर सध्या घसरु लागला असून वैयक्तिक हेवेदाव्यापोटी अशा कारवाया केल्या जात आहेत.