नाशिक (प्रतिनिधी) :- मागील भांडणाची कुरापत काढून चौघांनी मिळून एकावर प्राणघातक हल्ला केल्याने हल्ल्यातील जखमी युवकाची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, की रात्री 3 वाजेच्या सुमारास कुणाल विजय थोरात (वय 25, रा. पंचवटी) हा युवक पंचवटी भाजी मार्केटजवळील वज्रेश्वरी झोपडपट्टीजवळ असलेल्या सुलभ शौचालयामागे बसलेला होता. यावेळी मागील झालेल्या भांडणाची कुरापत काढून सोनू भिका मोरे, गोपाळ जाधव, विकी वाघ व शुभम् बनकर या चौघांनी कुणालवर प्राणघातक हल्ला केला.

काठ्यांनी व दगडाने त्याला बेदम मारहाण केल्यामुळे त्याच्या दोन्ही पायांना मोठ्या जखमा झाल्या. मार अधिक लागल्याने त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर चौघे आरोपी फरारी झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी कुणालचा भाऊ नीलेश थोरातने पंचवटी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 307, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.