पंचवटी (प्रतिनिधी) : सम्राटनगर येथे शनिवारी (दि. २१) मध्यरात्री अठरा ते वीस गुन्हेगार वृत्तीच्या टवाळखोरांनी एका महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून जाळपोळ केली. तसेच, आजूबाजूच्या घरांवर कोयत्याने हल्ला करीत काही घरांच्या काचा फोडल्याची खळबळजनक घटना घडल्याने परिसरातील दहशतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पीडित महिलांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास सम्राट नगर येथे सुमारे वीस ते पंचवीस गुन्हेगार प्रवृत्तीच्या टवाळखोरांनी येथील रहिवाशांच्या घरावर कोयते आणि दगडफेक करीत महिलांना अश्लील शिवीगाळ केली. याबाबत या महिलांनी त्यांना विचारणा केली असता तुम्हाला काय करायचे ते करा सांगत शिव्यांची लाखोली सुरु ठेवली. यामुळे भयभीत झालेल्या महिलांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहचत संशयित प्रशांत राजेंद्र निकम २८, अवधूत वाडी, दिंडोरी रोड, बबलू हेमंत शर्मा १९, अवधूत वाडी, दिंडोरी रोड, दिपक किसन चोथवे ३४, अश्वमेघ नगर, पेठ रोड, सुनिल निवृत्ती पगारे २४, अवधूत वाडी, दिंडोरी रोड या चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कोयते जप्त केले.

तर त्यांचे इतर साथीदार फरार झाले होते.आपल्या चौघा साथीदारांना पोलिसांनी पकडल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या इतर साथीदारांनी पुन्हा सम्राट नगर येथे येऊन संगीताबाई पुंडलिक बोडके ४० रा. सम्राट नगर या महिलेच्या घरावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकून घराला आग लावली. या आगीमध्ये महिलेच्या घराचा दरवाजा, पडदा, बाहेर वाळत टाकलेले कपडे जळून खाक झाले. तर पद्मा दामू लोंढे या महिलेच्या घराच्या खिडक्यांच्या काचा कोयत्याने वार करून फोडण्यात आल्या.
या टोळक्याने आजूबाजूच्या अनेक घरांवर कोयते मारून दहशत केली. काहींनी घरांवर दगडफेक केली. या घटनेने घाबरलेल्या महिला आपले घर सोडून इतरांच्या घरी रात्रभर राहिले. सकाळ झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना बोलावून त्यांनी रात्री आपबिती कथन करीत संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संशयितांनी सम्राटनगर येथे दहशत पसरविल्याने पोलिसांनी धाव घेत चौघांना अटक केली. मात्र, महिलेच्या घराला आग लावून पेटवून दिल्याची माहिती पोलिसांना मिळालेली नव्हती हे विशेष. तसेच, याठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांच्या काचा फोडण्यात आल्याचा आणि दगडफेक केल्याचा प्रकार देखील पोलिसांना समजला नसल्याने येथील रहिवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
रात्रीच्या सुमारास काही संशयितांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल होत चार संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून कोयते जप्त केले आहे. तक्रार देण्यास कोणीही पुढे आले नसल्याने पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घर जाळले असल्याची माहिती पिडीतांनी दिलेली नाही. तरी आम्ही स्वतः जाऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करू, असे पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांनी सांगितले.