नाशिक – येथील दवप्रभा फिल्म ॲण्ड प्रॉडक्शनच्या आयोजित भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेतील आठवे पुष्प पर्यावरण अभ्यासक, लेखक अतुल देऊळगावकर ‘निसर्ग शोभेपुरता?’ या विषयावर गुंफणार आहेत. शनिवार दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता कुर्तकोटी शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड येथे हे व्याख्यान होणार आहे.

भावना भार्गवे यांनी सुमारे ३६ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले. शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची एक ओळख होती. आशयपूर्ण कथा, कादंबरी आणि चरित्र याद्वारे लिखाणाची वेगळी शैली निर्माण करुन त्यांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले. नाशिकच्या शासकीय कन्या शाळेतून मुख्याध्यापकपदावर असताना त्या निवृत्त झाल्या. जून २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. १६ जुलै हा त्यांचा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून भार्गवे कुटुंबियांच्या वतीने व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. दरवर्षी व्याख्यान आयोजित केले जाते. यंदा अतुल देऊळगावकर यांचे ‘शोभेपुरता निसर्ग?’ या विषयावर मुक्तचिंतन होणार आहे.
डळमळले भूमंडळ, लॉरी बेकर, विश्वाचे आर्त, बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची अशी जवळपास १३ पुस्तके देऊळगावकर यांच्या नावावर आहेत. हवामान बदलाचे परिणाम, पाणलोट क्षेत्र विकास या विषयावरील अभ्यासात देऊळगावकर यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाठ्यवृत्ती मिळाली आहे. अनेक वर्तमानपत्रात ते नियमितपणे लेखन करतात. सर्वोत्तम पर्यावरणीय पत्रकार, पां. वा. गाडगीळ, राष्ट्रीय ग्रामीण पत्रकारिता, डॉ. राम आपटे प्रबोधन आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
गेल्या काही वर्षांत पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम सारेच अनुभवत आहेत. गतवर्षी नाशिकचा पावसाळा अगदी डिसेंबर, जानेवारीपर्यंत लांबला होता. विकास पर्वात जंगले नष्ट होत आहे, तसेच डोंगराचे सपाटीकरण सुरू आहे. त्यातून ब्रह्मगिरीसारखे गोदावरीचे उगमस्थान सुटले नाही. जंगलाशी संबंधित कायद्यात होणाऱ्या बदलांनी वन संवर्धनावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.अशा विविध प्रश्नांची उत्तरे या मुक्त चिंतनातून मिळणार आहेत. या व्याख्यानाचा नाशिककरांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन भार्गवे कुटुंबियांनी केले आहे.