नाशिक (प्रतिनिधी)- गुटखा वाहतूक करणार्या टेम्पोवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करून त्यातील गुटखा जप्त केला आहे. गुटक्याच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई अधिक गतिमान केली आहे.

अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयातर्फे बिडी कामगार नगर येथे केलेल्या कारवाईत सुमारे 1 लाख 13 हजार रपये किंमतीचा प्रतिबंधीत अन्नपदार्थ जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गुप्त माहितीनुसार बीडी कामगार नगर, अमृतधाम, पंचवटी येथे उभी असलेली वाहन पिकअप अॅपे क्र. एम एच 15 ईजी 5753 मध्ये महाराष्ट्र राज्यात उत्पादन, विक्री, साठवणूक व वाहतूक यांसाठी प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थाचा साठा व वाहतूक करतांना आढळून आला. जप्त प्रतिबंधीत अन्नपदार्थात विविध प्रकारच्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची पाकीटे आढळून आली.
त्याचबरोबर सुमारे एक लाख रुपये किंमतीचे पिकअप अँपे जप्त करण्यात आले. याप्रकरणी वाहनचालक व मालक जितेंद्र रघुनाथ नेरपगार (वय 42, रा. बीडी कामगार नगर, पंचवटी, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात भादंवी कलम 188, 272, 273 328 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गणेश परळीकर, सह आयुक्त (अन्न) तसेच उदय लोहकरे, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी दिनेश तांबोळी व संदीप देवरे यांनी केली.