नाशिक (प्रतिनिधी) :- काल अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा पकडल्यानंतर आज नाशिकरोड पोलिसांनी लॅमरोडवर 87 हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखू जप्त केले आहे.
लॅमरोडवरील लोटस हॉस्पिटलजवळ काल रात्री 10.40 वाजेच्या सुमारास मधुसूदन देवीदास चौधरी (वय 28) हा प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखू विक्रीसाठी एका छोट्या टेम्पोमधून आणणार असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी वरील ठिकाणी सापळा रचून चौधरीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 87, 756 रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त करण्यात आला आहे.
त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस हवालदार संजय ताजणे, देवकिसन गायकर, पोलीस नाईक नितीन भालेराव, रविंद्र दिघे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, चंद्रकांत बागडे, भाऊसाहेब कुटे व अविनाश फुलपगारे यांनी केली.