नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- राजधानी दिल्लीमध्ये तर तापमान सातत्याने 40 अंशांच्या वरती जात आहे. दिल्लीतील काही ठिकाणी पारा 45 अंशांपर्यंत गेल्याची नोंद झाली आहे. सायंकाळी सुद्धा तापमानात विशेष घट होत नाही. अशा स्थितीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज (9 जून) दिल्लीमध्ये टी ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे.

दिल्लीतील वातावरणाचा विचार करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आजच्या सामन्यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. दिल्ली टी ट्वेंटी सामन्या दरम्यान प्रत्येक 10 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने पत्रकार परिषदेत दिल्लीतील उष्माविषयी चिंता व्यक्त केली होती. ‘दिल्लीतील हवामान उष्ण असेल याची आम्हाला कल्पना होती पण, ते इतके जास्त असेल अशी अपेक्षा नव्हती. सुदैवाने सामना सायंकाळी उशिरा आहे. त्यामुळे खेळाडूंना स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तरी देखील दिल्लीतील उष्णतेचा सामना करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे’, असे तो म्हणाला होता.