मुंबई – कर्ज वेळेत न फेडल्याने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी काल झाली. या सुनावणीत तिघींना 28 फेब्रुवरी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

तिघींवर 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता याचिका करण्यात आली होती. त्या याचिकेवर काल अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तिघींनाही 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केला आहे.

परहड आमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने तिघांविरुद्ध त्यांची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, शिल्पा शेट्टी, बहीण शमिता आणि आई सुनंदा यांनी 21 लाखांचे कर्ज फेडले नाही, जे शिल्पा आणि शमिताचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी घेतले होते. त्यानंतर तक्रारदाराने जुहू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार पाठवली. जिथे त्यांना दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात कोर्टात खासगी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या विरोधात कलम 406, 420 आणि 34 अंतर्गत चौकशी होणार आहे.