देवळा :- येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या छात्र सेना विभागाची विद्यार्थिनी लक्ष्मी प्रविण पवार हिची नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड करण्यात आल्याने सर्व स्तरावरून तिचे कौतुक करण्यात येत आहे.
या महाविद्यालयाची सिनिअर अंडर ऑफिसर लक्ष्मी पवार ही तालुक्यातील भऊर येथील असून, तिची महाराष्ट्र निर्देशनालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी नवी दिल्ली येथे निवड करण्यात आली. महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत असलेली कु. लक्ष्मी ही अतिशय हुशार व कष्टाळू विद्यार्थिनी आहे. यापूर्वी देखील तिने दिल्लीत आजादी का अमृत महोत्सव, एन.सी.सी द्वारे विशेष राष्ट्रीय एकात्मता शिबिर, विजय शृंखला और संस्कृती का महासंगम मेगा इव्हेंट मध्ये नेतृत्व केले आहे. नवी दिल्लीत शिबिरामध्ये सर्व राज्यातील आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर 22 भाषेतील गाणे म्हणण्यामध्ये तिने सहभाग नोंदवला होता.

मुंबई ब ग्रुपकडून फायरिंग कॉम्पिटिशन मध्ये देखील सहभाग घेतला होता. कोरोना महामारीत तिने मास्क, फळे, धान्य, सॅनिटायझरचे वाटप केले होते. महाविद्यालयात होणार्या योगा, पुनीत सागर अभियान, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, लहान मुलांना शिकवणे, वृद्धांना मदत करणे, एड्स जनजागृती रॅली, तिरंगा रॅली, राष्ट्रीय एकता दौड, यासारख्या कार्यक्रमांमध्ये तिचा सहभाग आहे. तिच्या निवडीसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट बादल लाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
7 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी नाशिक कमांडिंग ऑफिसर कर्नल तरुण खन्ना व प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल रवी व्यास याच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. या निवडीबद्दल प्राचार्य हितेंद्र आहेर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. मालती आहेर, सचिव पांडुरंग पवार, उपप्राचार्य प्रा. विजयकुमार जोशी, प्रमोद ठाकरे, दिनेश वाघमारे आदींनी अभिनंदन केले आहे.