पुणे : राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात २७ तारखेला ही पोटनिवडणूक होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारी, तर ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर २ मार्च रोजी मतमोजणी करण्यात येईल. ३१ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल.

भाजपाच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. कोणत्याही आमदार वा खासदाराचे निधन झाल्यास विरोधकांकडून त्या जागेवर उमेवार उभा केला जात नाही. त्या जागेवर बिनविरोध निवडणूक पार पडते. तसा महाराष्ट्रात प्रघात आहे. त्यामुळे या दोन जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.