मोठी बातमी! बंडखोर सत्यजित तांबे काँग्रेसकडून निलंबित

नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे यांचे अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (दि. १९) एकत्र पत्रकार परिषद घेत, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेसकडून नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली.

दरम्यान, सत्याजीत तांबेंच्या बंडखोरीनंतर नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये मोठा ट्वीस्ट आला होता. त्यानंतर काँग्रेसकडून सत्यजीत तांबेंवर कारवाई करण्यात आली आहे. आज मविआने नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि नागपूरमध्ये सुधाकर आडबालेंना पाठिंबा देण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. ते मविआच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मविआचे पाचही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. अपक्ष उमेदवाराने कोणाला पाठिंबा मागायचा आणि कोणाला मागायचा नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सत्यजीत तांबेंना आता भाजप पाठिंबा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधानपरिषद निवडणूक मविआ एकत्रपणे लढणार असल्याचे देखील यावेळी पटोलेंनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच दुसऱ्यांची घरे फोडण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोप देखील पटोलेंनी यावेळी केला आहे. राज्याची जनताच भाजपला धडा शिकवेल असे म्हणत थोरातांशी आम्ही संपर्कात असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!