नाशिकरोड (प्रतिनिधी) :– सिन्नर येथील एका खासगी सावकारावर सावकारी अॅक्ट खाली कारवाई न करण्याच्या बदल्यात तालुका सहाय्यक निबंधकास 20 लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई नाका परिसरात रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या महिन्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की रणजित महादेव पाटील तालुका सहाय्यक निबंध हे निफाड येथे कार्यरत आहे व त्यांच्याकडे सिन्नर तालुक्याचा अतिरिक्त कारभार आहे. आज सकाळी पाटील व तालुका सहाय्यक निबंध कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन विरनारायण यांनी सिन्नर येथील सावकाराच्या घरी छापा टाकला.
छापा टाकल्यानंतर त्यांना आक्षेपार्ह कागदपत्र मिळून आले. त्या अनुषंगाने सावकारी कायद्याखाली कारवाई टाळण्यासाठी या लाचखोरांनी वीस लाखांची लाचेची मागणी केली. वीस लाखाची लाच मागितल्यानंतर खाजगी सावकाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे उभयंतांची तक्रार दाखल केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे यांनी महिला पोलीस निरीक्षक व पथकास लाच घेणाऱ्या तालुका निबंधक व वरिष्ठ लिपिक यांच्या मागावर पाठवले.
सिनेमा स्टाईल लाच घेताना रणजीत महादेव पाटील या तालुका सहाय्यक निबंधकास रंगेहाथ पकडण्यात आले. मुंबई नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वी अनेक लाचखोरांना ताब्यात घेऊन कारवाई केली.
मात्र लाचखोरी अजूनही थांबलेली नसताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मात्र कारवाईसाठी सदैव तत्पर असल्याचे दिसून येत आहे.