नाशिक (प्रतिनिधी) :- सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी सहलीला गेलेल्या नगरसेविकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे.

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने घोषित केला आहे. १५ फेब्रुवारी रोजी नव्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी निवडणूक होणार आहे. सदस्यांची फोडाफोड होऊन नये यासाठी सर्व पक्षांनी काळजी घेत आपापल्या गटनेत्यांची निवड करत इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यामध्ये जिल्ह्यात पेठ, कळवण, देवळा, निफाड, सुरगाणा व दिंडोरी नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले. त्यानंतर २७ जानेवारीला नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली. त्यानंतर सगळ्यांनाच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीचे वेध लागले होते.
त्यामुळे सर्व सहाही नगर पंचायतीच्या प्रमुख राजकीय नेत्यांनी आपले नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना केले. त्याप्रमाणे सुरगाणा नगरपंचायतीचे नगरसेवक देखील वापी येथे एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले होते. दुर्गा नगर पंचायती मध्ये एकूण 17 जागा असून त्यामध्ये भाजपाचे 8, शिवसेनेचे 6, माकपा 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. भाजपचे सर्व नगरसेवक व येथे एक हॉटेलमध्ये थांबले असताना येथील प्रभाग क्रमांक 16 च्या भाजपा नगरसेविका काशिबाई पवार यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या नगरपंचायतीमध्ये भाजपाला आपले बहुमत सिद्ध करायचे होते. त्यामुळे या खुर्चीच्या राजकारणात नगरसेविकेवर काळाचा घाला पडला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.