नाशिक (प्रतिनिधी) : “आसाराम बापू आश्रमात जाते,” असे सांगून घराबाहेर गेलेल्या मुलीचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात आढळून आला आहे.
कावेरी भाऊसाहेब जाधव (वय 16, रा. मु. शिरूर, पो. आडटप्पा, ता. चांदवड) असे गोदापात्रात सापडलेल्या मुलीचे नाव आहे. कावेरी ही 24 नोव्हेंबर रोजी आसाराम बापू आश्रमात जाते, असे सांगून घरातून निघून गेली होती. ती कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाली होती.

याबाबतची खबर कावेरीचा चुलत भाऊ प्रसाद अभिमान जाधव (रा. सावरकरनगर, नाशिक) याने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली होती. काल दुपारच्या सुमारास कटारिया ब्रिजजवळ गोदावरी नदीपात्राच्या बाजूल या मुलीचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना दिसून आला. अग्निशमन दलाच्या मदतीने तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.