आज व्यक्ती हेल्थ कॉन्शस झाला आहे. प्रत्येक वेळेस काय खावे, काय खाऊ नये, हे तो बघत असतो. शरीरस्वास्थ्य चांगले राहावे, आजारी पडू नये, यासाठी तो काळजी घेतो; परंतु आज या सर्व बाबींचा सोबतच मन सुद्धा सुदृढ राखणे खूप गरजेचे आहे. मन जर सुदृढ असले तर स्वास्थ्य सुद्धा चांगले राहते; मात्र मन कमकुवत असले कमजोर असले, द्विधा मन:स्थिती असेल, तर स्वास्थ्य सुद्धा खराब होते, स्वास्थ्य ढासळू शकते. यासाठी मनाला सुदृढ ठेवणारा राजयोगा मेडिटेशन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. ब्रह्माकुमारी संस्थेच्या सर्व सेवा केंद्रांवर हा राजयोग मेडिटेशन कोर्स नि:शुल्क उपलब्ध असून, प्रत्येकाने या कोर्सचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले आहे.
ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध शाखांमार्फत शरीर आणि मन स्वस्थ राहण्यासाठी प्राणायाम, योगासन व राजयोग मेडिटेशनचे कार्यक्रम घेतले जात आहेत याच शृंखलेत म्हसरूळ येथील स्थानीय ब्रह्माकुमारी मुख्य सेवा केंद्रात प्रभू प्रसाद सभागृहात महिलांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी वासंती दीदी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी डॉ. सोनखासकर, नगरसेविका वत्सला खैरे, योगशिक्षिका डॉ. मनीषा कापडणीस, ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, ब्रह्माकुमारी वीणा दीदी, ब्रह्माकुमारी पूनम दीदी, ब्रह्माकुमारी सरला दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे कर्मवीर वावरे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनखासकर यांनी सांगितले, की आज आपणास समाजाशिवाय पर्याय नाही. कोरोना महामारीने रावांपासून रंकापर्यंत सर्वांना एका रांगेत आणलेले आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योगाचे महत्त्व अधोरेखित होते. जो आरोग्यदायी असेल तोच सुखी होऊ शकतो. म्हणूनच योगाचे महत्त्व सर्व जनतेपर्यंत आपल्याला पोहोच व्हायलाच पाहिजे. यातूनच सुखी समाजाची निर्मिती होऊ शकते, असे मत डॉ. सोनखासकर यांनी या प्रसंगी मांडले. नगरसेविका व काँग्रेस प्रदेश महिला कोर कमिटीच्या नवनियुक्त सदस्या वत्सला खैरे यांनी ओम शांती परिवारात आल्यावर प्रफुल्लित वाटते, येथे येऊन आत्म्याची बॅटरी चार्ज होते, अधिकाधिक वेळ ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात घालवायला पाहिजे, असेही मत वत्सला खैरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कोरोनाच्या काळात कोरोनाच्या रुग्णांना भेटून औषधोपचार सोबतच हा भगवंताचा प्रसाद आहे यामुळे तुम्ही लवकर बरे होणार, मनात हिंमत ठेवा, भगवंताची आठवण करा, असे सांगून दवा सोबत दुवा, कशी कामी आली, हेही वत्सला ताईंनी याप्रसंगी स्वानुभव व्यक्त केले.
कोपरगाव येथून खास उपस्थित ब्रह्माकुमारी सरला दीदी यांनी सांगितले, की कोणताही विषय चिंतेचा तेव्हाच बनतो जेव्हा आपण त्याला चिंतेचा बनवतो. आज गृहिणी भोजन बनविताना किंवा कोणालाही पाणी देताना भगवंताचे स्मरण करत नाही. बरेच वेळेस त्यांच्या मनात नकारात्मक भाव नकारात्मक विचार चालत असतात. या विचारांचा प्रभाव भोजन खाणारे, पाणी पिणारे, यांच्या मनावर होत असतो त्यामुळे प्रत्येकाने भोजन बनविताना प्रभू स्मरण करताना करत किंवा स्मृतीचे गीत लावून शुद्ध अंत:करणाने भोजन बनवायला हवे त्याचप्रमाणे आपल्या मुलांना पाणी, दूध देताना किंवा कोणते लिक्विड देताना त्यावर प्रथम ईश्वरीय शुभ संकल्पांचे प्रकंपन टाकून असे पाणी दिल्यास त्या प्रकारची वाणी तयार होते असे ही सरला दिदी यांनी नमूद केले. कार्यक्रमात ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांनी सर्वांना अंतर्मनाची सफर घडवून, मेडिटेशनचे महत्त्व सांगितले. सर्व सभा या मेडिटेशनने तल्लीन झाली होती. ब्रह्मकुमारी पुष्पा दीदी यांनी आभारप्रदर्शन, तर सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले. स्वागत नृत्य श्वेताने तर ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी पुष्पाद्वारे स्वागत केले. कार्यक्रमात शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात दहावी व बारावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले, अशा ब्रह्मकुमारी परिवारातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.