लासलगाव :- निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील असणाऱ्या नांदुर्डी गावातील किशोर गंगाराम शिंदे (वय ३३) हा तरुण अमृतसर येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना या वीर जवानाला अपघाती वीर मरण आल्याने नादुंर्डी गावावर शोककळा पसरली.

शिंदे कुटुंबात या अचानक आलेल्या प्रसंंगाने दुःखाचे गडद सावट पसरले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दिड वर्षाची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. घरात मोठा असल्याने घरातील कर्ता पुरूष गेल्याने शिंदे कुटूंबाचे दुःख हलके करण्यासाठी नादुंर्डी सह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरी गर्दी करून शिंदे कुटुंबाचे सांत्वन करत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किशोर शिंदे यांचे पार्थिव हे अमृतसर येथून दिल्लीला विमानाने आणले असल्याचे समजते तर तेथून मोटारीने त्यांचे पार्थिव घेऊन बीएसएफचे जवान हे नादुंर्डी कडे रवाना झाल्याचे समजते. त्यांचे पार्थिव नांदुर्डी कडे जवळपास 24 तास लागणार असल्याने उद्या होणारा त्यांचा अंत्यसंस्कार हा सदर वाहन येताच होण्याची शक्यता आहे.
सतीश कुमार नावाचे सैन्य दलाचे अधिकारी पर्थिवसमवेत आहेत असे निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याने कार्हाबाई तीरी असणाऱ्या मोकळ्या पटांगणात चबुतरा व मंडप टाकण्याचे काम नांदुर्डी ग्रामपालिका, नांदुर्डी तलाठी कार्यालय, रानवड मंडल अधिकारी, नांदुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व किशोर शिंदे यांचे शालेय मित्र हे जातीने लक्ष ठेवून आहेत.