नाशिक (प्रतिनिधी) :- घरातील महिला वडिलांना दवाखान्यात घेऊन गेल्याची संधी साधून अज्ञात इसमाने घरफोडी करीत सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना तिडके कॉलनीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कविता दीपक चंद्रात्रे (वय 41, रा. गोपाळ अपार्टमेंट, तिडके कॉलनी, त्र्यंबक रोड, नाशिक) या 14 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या वडिलांना टिळकवाडी येथे डॉक्टरांकडे घेऊन गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने चंद्रात्रे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील लॉकरमध्ये असलेले 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे 90 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेढे, 40 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, 80 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 16 हजार रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, तसेच 25 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 5 लाख 21 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला.

चंद्रात्रे दवाखान्यातून घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून घरफोडीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.