नाशिक प्रतिनिधी: भर दुपारी ब्युटीपार्लरमध्ये घुसून तेथील महिलेवर अतिप्रसंग करणार्या आरोपीस न्यायालयाने जन्मठेप व तीन वर्ष सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या 27 सप्टेंबर 201 रोजी पवननगर सिडको येथील श्रीरामनगर भागात आराध्या ब्युटी पार्लरमध्ये महिला काम करीत असतांना आरोपी नितीन सुभाष पवार (वय 33, रा. श्रीरामनगर) याने चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार केले. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली होती.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक यु.आर. सोनवणे यांनी तपास करून खटला कोर्टात पाठविला. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे (विशेष पोक्स न्यायालय) न्या. एस.एस. खरात यांच्यासमोर चालले.
न्यायमूर्तींनी आरोपीस भादंवि 376 (2) (एम) अन्वये जन्मठेप व 2000 रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच भादंवि 452 अन्वये तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याचे कामकाज सहाय्यक सरकारी वकील श्रीमती अपर्णा पाटील व श्रीमती एस.एस.गोरे यांनी पाहिले. गुन्हा शाबीत होण्याच्या दृष्टीने पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व वरिष्ठ अधिकार्यांनी तपासी अधिकारी, गुन्हे शाखा, अभियोग कक्ष या सर्वांचे अभिनंदन केले आहे.