पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. येत्या सहा महिन्यात ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आता गिरीश बापट यांचा वारस कोण? याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून 5 नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत.
या पाच जणांपैकी भाजप एकाला उमेदवार म्हणून संधी देणार मात्र या पाचही जणांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक नवीन प्रोजक्ट्स हाती घेतले आहेत. शिवाय त्यांनी पुण्यातील इतर विषयांवरदेखील केंद्रीय स्तरावर नाव कमवलं आहे. तर काँग्रेसमधून दोन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपमधून कुणाला आणि काँग्रेसमधून कुणाला उमेदवारी दिली जातेय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान पोटनिवडणूक जाहीर झाली तर बापटांच्या कुटुंबियांमधील सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. मुलगा गौरव बापट आणि सून स्वरदा बापट या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. मात्र गौरव हे राजकारणात फार सक्रिय नाहीत त्यामुळे स्वरदा यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. बापटांच्या घरी उमेदवारी दिली तरच निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असा अंदाज आहे.