24 हजारांची लाच मागणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध गुन्हा

नाशिक (प्रतिनिधी) :- वैद्यकीय बिल पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यासाठी तब्बल 24 हजार रुपयांची लाच मागणार्‍या जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ लिपिका विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरकारवाडा पोलिसांकडे गुन्हा नोंदविला आहे. राजेश सुधाकर नेहुलकर असे लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

तक्रारदाराच्या पत्नीचे आजारपणाचे वैद्यकीय बिल पुढील कार्यवाहीसाठी पाठवायचे होते. या कामासाठी तक्रारदाराने पाठपुरावा केला असता नेहुलकर याने एकूण बिलाच्या पाच टक्क्यांप्रमाणे 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला असता तक्रारदाराला तडजोडीच्या चर्चेचा उपाय सांगितला होता.

गेल्या 10 ऑगस्ट रोजी तक्रारदाराने नेहुलकर याच्याकडे रक्कम कमी करण्यासाठी चर्चा केली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने योग्य तो सापळा रचला होता. चर्चेत नेहुलकर याने 5 टक्क्यांऐवजी 4 टक्क्यांप्रमाणे 24 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या मागणीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे दिसून आल्याने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये नेहुलकर याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

बदलीसाठी पोलिसांना बोगस दाखले दिल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रकरण गाजत असतानाच पुन्हा एकदा वरीलप्रमाणे लाचलुचपत प्रकरण उघडकीस आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!