नाशिक (प्रतिनिधी) :– वोक्हार्ट हॉस्पिटलने कोविडच्या साथीच्या काळात प्लाझ्मा देणे व उपचाराच्या नावाखाली नऊ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी राहुल प्रकाश बोराडे (रा. दामोदरनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी मुंबर्ई नाका पोलीस ठाण्याकडे नोंदविली आहे.

या फसवणूक प्रकरणी प्रारंभी दाद न मिळाल्यामुळे फिर्यादी राहुल बोराडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई नाका पोलिसांनी आर्थिक फसवणूक आणि रुग्णाच्या मरणास कारणीभूत झाल्याबद्दल हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

राहुल बोराडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचे वडील प्रकाश दामोदर बोराडे (वय 62) हे दि. 12 ते 28 ऑगस्ट 2020 दरम्यान वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये कोविड आजाराच्या उपचारासाठी दाखल होते. यावेळी हॉस्पिटलच्या वतीने प्रकाश बोराडे यांना औषधाची फारशी गरज नसताना हॉस्पिटलच्या आर्थिक फायद्यासाठी विविध औषधांचे डोस देऊन निष्काळजीपणाने उपचार केले, तसेच रुग्ण बोराडे यांना प्लाझ्माची गरज आहे, असे सांगून 30 हजार रुपयांच्या दोन बॅगा असा प्लाझ्मा दिल्याची हॉस्पिटलच्या बिलात खोटी नोंद केली; मात्र या उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. अखेर प्रकाश बोराडे यांचे निधन झाले. या उपचारापोटी हॉस्पिटलने बजाज अलायंस लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून पाच लाख रुपये, फिर्यादी राहुल बोराडे यांच्याकडून तीन लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर पद्धतीने व एक लाख रुपये रोख अशी नऊ लाखांची रक्कम उकळली. राहुल बोराडे यांनी न्यायालयात जाऊन या फसवणुकीचा सीआरपीसी 156 (3) अन्वये तपास करावा, अशी मागणी केली होती.
त्यावर प्रथम वर्ग चौथे सहन्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये वोक्हार्ट हॉस्पिटल मधील दोघांविरुद्ध एकूण नऊ लाख रुपयांची फसवणूक व रुग्णाच्या मरणास कारणीभूत झाले, म्हणून वोक्हार्ट हॉस्पिटलचे संबंधित अधिकृत व्यक्ती आणि सुदर्शना पाटील (रा. वाणी हाऊस, वडाळा नाका) यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी भा. दं. वि. कलम 406, 420, 304 (अ) व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे करीत आहेत.