नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथून जवळच असलेल्या चाडेगाव शिवारातील उसाच्या शेताला काल शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात जवळपास साडेतीन एकर ऊस जाळून खाक झाला.
शेतकऱ्यांच्या प्रसंगावधाने राखल्याने शेताला लागून असलेला बारा एकर उस आगी पासून सुरक्षित राहिला. नाशिक सहकारी साखर कारखाना राजकीय व आर्थिक कचाट्यात सापडल्याने बंद आहे. त्या मुळे या भागातील उस हा दुसऱ्या कारखान्याला द्यावा लागतो. मात्र स्थानिक शेतकऱ्याचा उस संपल्यानंतर तुमचा उस घेण्याचा विचार करू असे कारखाना प्रशासन सांगत असल्याने येथील शेतकऱ्यावर संकट निर्माण झाले आहे.
आजमितीस शेतकऱ्याच्या मळ्यात गेल्या पंधरा-सोळा महिन्यापासून उस उभा असून कारखान्या सोबत व्यवहार झाल्या नंतर त्याची तोडणी केली जाते. तसेच थंडी संपल्या मुळे उन्हाची तीव्रता दिसू लागली आहे. चाडेगाव शिवारात उत्तम पुंजाजी नागरे, सुदाम नागरे, छगन नागरे, विश्वनाथ नागरे यांच्या उसाच्या शेता वरून वीज वितरण कंपनीच्या तारा गेल्या आहेत. काल दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हळूहळू आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी कुटूंबासह धाव घेतली. पाण्याच्या मोटर चालू करून आग विझवू लागले तर जवळपास दोनशे ते अडीशे शेतकऱ्यांनी आग लागलेल्या क्षेत्राच्या बाजूचा उस काढून घेण्यास सुरुवात केली. तो पर्यंत अग्निशामक दलाला कळविल्यानंतर नाशिकरोड अग्निशामक केंद्रातून एक बंब आला मात्र तो घटनास्थळी पोहचू शकला नाही. तर शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून अथांग परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे शेजारी असलेला सुमारे बारा एकर उस वाचला.तर साडेतीन एकर उस आगी च्या आगीच्या भक्ष्यस्थानी गेला.
घटनेचे माहिती समजताच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण नागरे यांनी घटनास्थळी जाऊन बाधित शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने पंचनामे करून त्याचा खर्च भरून द्या अशी मागणी करत राजकीय व आर्थिक कचाट्यात सापडलेला नाशिक सहकारी साखर कारखाना तत्काळ चालू करण्याची मागणी केली. याबाबत महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व कृषीमंत्री ना. दादा भुसे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.