नाशिकरोड (प्रतिनिधी):- सामनगाव रोड वरील चाडेगाव शिवारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या बंद बंगल्यात चोरीच्या इराद्याने हत्यारे घेऊन घुसणाऱ्या दोन चोरट्यांना गावकऱ्यांनी मोठ्या शिताफीने पकडले. नाशिकरोड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा घरफोडी चा प्रयत्न करणे या गुन्हयात अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण नामदेव नागरे यांचा चाडेगाव शिवारात सामनगाव रोडवर प्रशस्त बंगला आहे. नागरे हे नाशिकरोड येथे राहत असल्याने सध्या बंगला बंद आहे. आज सायंकाळी साडेपाच च्या सुमारास नागरे यांच्या बंगल्या लगत राहत असलेल्या त्यांच्या नातेवाईक यांना नागरे यांच्या बंगल्यात कोणी तरी गेले असून वरच्या मजल्यावरून ते खाली उतरत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती नागरे यांना देत गावकऱ्यांना दिली. वेळीच गावकऱ्यांनी नागरे यांच्या बंगल्याकडे धाव घेतली असता चोरटे बंगल्याला लागून असलेल्या उसाच्या शेतात लपून बसले. उस मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांना शोधणे अवघड झाले.

तरीही जीवाची पर्वा न करता गांवकरी, प्रवीण नागरे आदी उसात चोरट्याचा शोध घेऊ लागले. नाशिकरोड पोलिसांना सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे आदीसह गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
नागरिक ऊस पेटवतील या भीतीने तब्बल चार तासानंतर ते चोरटे भीतीने रस्त्याकडे पळू लागले, गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करीत त्यांना पकडून चांगलाच चोप दिला. पोलिसांनी या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले.
रात्री उशिरा त्यांना घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली.