नाशिक (प्रतिनिधी) :– पायी फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना बळी मंदिर परिसरात घडली.

फिर्यादी रत्नमाला दयाराम कराटे (वय 61, रा. वृंदावन कॉलनी, बळी मंदिराच्या पाठीमागे, नाशिक) ही महिला काल सकाळी साडेअकरा वाजता शिंदे फार्म रोडने घराकडे पायी फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी एक मोटारसायकल त्यांच्याजवळ थांबली. मोटारसायकलीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाने मोटारसायकलीवरून उतरून कराटे यांच्याजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून चोरून नेली.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.