नाशिक (प्रतिनिधी) – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महापालिका आयुक्त रमेश पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्याजागी एमएमआरडीएचे सह व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉ. पुलकुंडवार यांनी त्वरित नवीन कार्यभार स्विकारावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नाशिक महानगर पालिकेचा 22 मार्च रोजी आयुक्त तथा प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी पदभार स्विकारला होता. पवार यांनी पदभार स्विकारल्यानंतर सुरुवातीला महापालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेतले होते. त्यात काही विकास कामांना सुद्धा त्यांनी ब्रेक लावला होता. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जात होते.

त्यामुळेच त्यांची या जागेवर बदली झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आयुक्त पवार यांची बदली होणार असल्याची चर्चा रंगली होती. या दरम्यान आयुक्त पवार यांनी मुंबईवारी सुद्धा केली असल्याचे सांगितले जात होते, परंतु अखेरीस पवार यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
आयुक्त पवार यांच्या जागी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांनी त्वरीत हा पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे उद्या हे पदभार स्विकारतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.