नाशिक (प्रतिनिधी) :– रेल्वे विभागामध्ये नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवीत फसवणूक करणार्या तीन आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात नांदगावमध्ये राहणारे चेतन शिवाजी इघे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून, तसेच जेटमनपदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने व बनावट नियुक्तिपत्र, सही-शिक्के देऊन ऑनलाईन फॉर्म भरून यातील आरोपी ज्ञानेश नथू सूर्यवंशी (रा. गणपती मंदिर, पवननगर, सोयगाव, मालेगाव) याने टीसी पदासाठी 15 लाख आणि जेटमनपदासाठी 12 लाख रुपये लागतील, असे सांगून फिर्यादी व त्यांच्या मित्रपरिवाराकडून पैसे घेतले, तसेच सहआरोपी सतीश गुंडू बुच्चे (रा. सद्गुरू हाईट्स, पुणे), तसेच संतोष शंकर पाटील (रा. वंडर सिटी, कात्रज, पुणे) यांनी बनावट सहीशिक्के, तसेच सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा, बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई, राणी मुखर्जी हॉस्पिटल, उत्तर रेल्वे, दिल्ली या ठिकाणी मेडिकल झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती.
या प्रकरणात ज्ञानेश नथू सूर्यवंशी (रा. मालेगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, पोलीस कर्मचारी भारत कांदळकर, अनिल शेरकर, सचिन कुर्हाडे, सागर कुमावत, संदीप मुंडे यांचे पथक तपास करीत आहे.