नाशिक (प्रतिनिधी) :– रिवॉर्ड पॉईंट घेण्यासाठी पाठविलेल्या लिंकवर क्रेडिट कार्डची माहिती घेऊन एका इसमास अज्ञात भामट्याने तीन लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अनिल गोपीचंद चव्हाण (वय 43, रा. सानिका अपार्टमेंट, पाईपलाईन रोड, सातपूर) यांना दि. 17 मे रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून अज्ञात इसमाने फोन केला. तो म्हणाला, की अॅक्सिस क्रेडिट कार्डावरील जमा झालेले रिवॉर्ड पॉईंट घेण्यासाठी रिवॉर्ड-पॉईंट डॉट इन ही लिंक पाठविली आहे.

त्यानुसार चव्हाण यांना या लिंकच्या ऑनलाईन पेजवर क्रेडिट कार्ड क्रमांक, जन्म दिनांक, मेल आयडी व मोबाईल क्रमांकाची माहिती भरण्यास भाग पाडले. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी आला. हा ओटीपी कुठेही पेजवर टाईप केला नाही अथवा शेअर केला नाही. तरीही चव्हाण यांच्या क्रेडिट कार्डवरून अज्ञात इसमाने अनधिकृतपणे व्यवहार करून सुमारे तीन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. आपल्या खात्यातून ही रक्कम अचानकपणे शिल्लक नसल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.