देवळा (वार्ताहर) :- भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत रोजंदारीवरील सफाई कामगाराने कोट्यवधींचा घोटाळा केला असून आतापर्यंत 32 खात्यांवरील 1 कोटी 50 लाख 73 हजार 450 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस पथक या फरारी कर्मचार्याच्या मागावर आहेत.

या घटनेबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भऊर येथिल महाराष्ट्र बँकेच्या शाखेत भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर ता. देवळा ) हा सन 2016 पासून ते 8 जुलै 2022 पावेतो रोजंदारीवर कार्यरत होता. त्याने त्याच्या पदाचा गैरफायदा घेऊन ठेवीदार,खातेदार यांचा विश्वास संपादन करून बँकेतील जवळपास 32 खातेधारकांच्या खात्यावरील पीक कर्जाची रक्कम घेऊन बँकेच्या सही शिक्का असलेल्या स्वतःच्या हाताने लिहिलेल्या मुदत ठेवीच्या पावत्या बनावट तयार करून त्या बँके ठेवीदारांना त्त्यांचेकडील रक्कम स्वीकारून अदा केल्या. व सदरची रक्कम बँकेत जमा न करता स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वापरली.
एकूण 1 कोटी 50 लाख 73 हजार 450 रुपये एवढ्या रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले असून, या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मालेगाव येथील बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून , आरोपीच्या विरोधात अफ़रातफ़रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबधीत आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. आर. देवरे आदी करीत आहेत. सहकारी बँक, पतसंस्थेत आर्थिक घोळ झाल्याचे व पैसे बुडाल्याचे चित्र नागरिकांनी बघितले आहे . मात्र राष्ट्रीयकृत बँकेत अशा प्रकारे अपहार होत असेल तर नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवावा.
ग्रामीण भागात काबाड कष्ट करून, पोटाला चिमटी देत आपली पुंजी बँकेत ठेवतात. त्यालाही सुरक्षितता नाही. अशी खंत नागरिक व्यक्त केली असून, भऊर येथिल महाराष्ट्र बँकेतुन अपहार झालेली रक्कम संबंधित खातेदारांना तात्काळ मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष पंडितराव निकम यांनी केली आहे. या प्रकरणाच्या तपशील व तपासानंतर अपहाराची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.