नाशिक (प्रतिनिधी) :– पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाच्या हातातील अंगठ्या काढून हातचलाखीने फसवणूक केल्याची घटना सिन्नरला घडली.

याबाबत पालिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की अरुण निरुती भोसले (वय 64, रा. संजीवनी नगर, सिन्नर) हे काल दुपारी मंदिरातून दर्शन घेऊन घरी जात होते. त्यावेळी 2 अनोळखी इसम त्यांच्या जवळ येत “आम्ही क्राईम ब्रांच चे असून, पुढे लूटमार चालू आहे, तुमच्या हातातील अंगठ्या काढून खिशात ठेवा” असे सांगितले. भोसले यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या हातातील चार बोटात असलेल्या अंगठ्या काढून कागद घेऊन खिशात ठेवल्या.

नंतर त्या दोघा तोतया पोलिसांनी हातचलाखीने भोसले यांच्या खिशातील सोन्याच्या अंगठ्या असलेली पुडी काढून दगडाची पुडी त्यांच्या खिशात ठेवून भोसले यांची 70 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत.