नाशिक (प्रतिनिधी) :- बनावट इसार पावती तयार करून तोतया महिला उभी करून प्लॉट विकणार्या पाच जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी स्नेहल सुधाकर कदम (वय 36, रा. विरार पश्चिम, मुंबई) यांचे एकूण पाच प्लॉट आहेत. दरम्यान, आरोपी ज्ञानदेव आसाराम कुदळे, तौसिफ शेख, हेमंत शांताराम भालेराव, इम्तियाज (पूर्ण नाव माहीत नाही) व स्नेहल सुधाकर कदम या नावाने उभी राहिलेली एक अनोळखी महिला अशी आरोपींची नावे आहेत.

या सर्वांनी संगनमत करून दि. 21 मे 2022 ते दि. 5 जुलै 2022 या कालावधीत वकील दर्शना खर्डे यांच्या कामटवाडे परिसरातील अभियंतानगर येथील कार्यालयात फिर्यादी यांच्या मालकीचे पाथर्डी शिवारातील पाच प्लॉटचे फिर्यादीच्या नावाने बनावट इसार पावती बनवून बोगस पॅन कार्डाचा वापर करून स्नेहल कदम या नावाने अनोळखी महिलेला उभे केले व तो प्लॉट किरण प्रकाश शिंदे यांना विक्री करण्यासाठी बनावट इसार पावती बनवून फिर्यादी स्नेहल कदम यांची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर कदम यांनी अंबड पोलीस ठाण्यात या पाचही आरोपींविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.