मुंबई :- राणा दाम्पत्याने मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांनी आज खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती आ. रवी राणा यांना नोटीस बजावली आहे. पोलिस उपायुक्त मंजुनाथ यांनी त्यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. उद्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा राणा दांपत्याने केली आहे. शिवसैनिक आज दिवसभर मातोश्री बाहेर ठाण मांडून होते.

“तुम्ही कृपा करुन सगळ्याजणांनी घरी जा. इकडे कोणी हिंमत करणार नाही. तुम्ही दिवसभर इथे आहात त्यामुळे घरी जा,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना केले आहे.
पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतरही नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाण्यावर ठाम आहेत. उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार असून, सुरक्षा व्यवस्था बिघडू नये, अशी आमची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही लोकांना तेथे येण्यास मनाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.