नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेने सिटीलिंकच्या माध्यमातून सुरु केलेल्या शहर बससेवेला आज (दि. 8) रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, या वर्षभरात तब्बल 1 कोटी 63 लाख 46 हजार 765 प्रवाशांनी सिटीलिंकच्या माध्यमातून प्रवास केला आहे. याशिवाय सिटीलिंकने गेल्या वर्षभरात एकूण 9 6,80,15 9 कि.मी. चा प्रवास केला आहे. एक वर्षांत सिटीलिंकने केलेल्या कामामुळे या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले.

सिटीलिंक प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करून देते. या सवलतीच्या पासेसचा देखील गेल्या वर्षभरात तब्बल 26 लाख 83 हजार 482 प्रवाशांनी लाभ घेतला. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त नाशिककरांना विविध स्पर्धा व कार्यक्रमांच्या वतीने आकर्षित करण्याचा प्रयत्न सिटीलिंकच्या वतीने करण्यात येत आहे. 8 जुलै रोजी सिटीलिंकच्या वतीने डिजिटल तिकिटांवर 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. उद्या दि. 9 जुलैपासून वर्षभर ऑनलाईन तिकीट घेणार्या प्रवाशांना पाच टक्के सूट देण्यात येणार आहे. सेल्फी विथ सिटीलिंक कॉन्टेस्ट नाशिककरांना सेल्फी विथ सिटीलिंक ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातून लकी ड्रॉ च्या आधारे यातील 05 स्पर्धकांची निवड केली जाईल व या पाच भाग्यवान स्पर्धकांना प्रत्येकी 1 महिन्याचा मोफत ओपेन एन्डेड पास बक्षीस स्वरूपात दिला जाणार आहे.
शाळा व महाविद्यालयांमध्ये सिटीलिंक सप्ताह साजरा करणार आहे. या सप्ताहात अधिकाधिक विद्यार्थीसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी शाळा व महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना बस सुविधा, मार्ग, पास सवलती आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी शहरातील 20 प्रमुख शाळा व महाविद्यालयांची निवड केली जाणार आहे. चालक व वाहक हे सिटीलिंक बस सेवेचा कणा आहेत. त्यामुळे चालक व वाहक यांच्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणार्या चालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सिटीलिंक सुपर रायडर सर्वाधिक पास वापरणारे सिटीलिंक प्रवासी व जास्त रक्कम असलेले टॉप पाच पास वापरकर्ते सिटीलिंक रायडर म्हणून निवडले जाणार आहेत. सुपर रायडर्सना एक महिन्याचा ओपेन एन्डेड पास (1500 रुपये) व स्टार बॅज देण्यात येणार आहे. चालक व वाहकांकरिता अपोलो हॉस्पिटल यांचेमार्फत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचेही सिटीलिंकच्या वतीने सांगण्यात आले आहे.