मुंबई :– एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक आज पार पडली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.

राज्याच्या राजकारणात खळबळ मजली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याचे चित्र निर्माण झाले असल्याने सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना सत्ताधाऱ्यांकडून मात्र अल्पमतात आलो नसल्याचा दावा केला जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषण करत बंडखोर शिवसेना आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांना देखील सुनावले आहे.
ठाकरेंनी बंडखोरांना परखड शब्दांत सुनावले. “काय तुमचं कर्तृत्व? हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मत मागा”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “आधी नाथ होते, आता दास झाले. बंडखोरांनी त्यांचा निर्णय घ्यावा. बाळासाहेबांचे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही. शिवसेना निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल”, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यावेळी दिला.