नाशिक (प्रतिनिधी) :- वाहनात सीएनजी गॅस भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकास पंपाच्या व्यवस्थापकासह सहा जणांनी मारहाण केल्याची घटना विल्होळी येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अक्षय नारायण कामत (रा. एव्हरेस्ट अपार्टमेंट, भांडुप पूर्व, मुंबई) हे विल्होळी येथील महाराष्ट्र नॅचरल गॅस पंप येथे काल दुपारी दीड वाजता वाहनात सीएनजी गॅस भरण्यासाठी थांबले होते. पंपावर ऑनलाईन पेमेंट व कार्ड पेमेंट बंद असल्याने त्यातील भाऊसाहेब आव्हाड (वय 35) या कर्मचार्याने जास्तीचे 40 रुपये मागितले. त्यावेळी कामत यांनी “तुम्ही आधी गॅस भरा; पण जास्तीचे पैसे मिळणार नाहीत.”

या बोलण्याचा राग आल्याने पंपाचे व्यवस्थापक नरेंद्र हिरालाल प्रसाद (वय 35) व इतर सहा कर्मचार्यांनी कामत यांना वाईटसाईट शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.