जुगार अड्ड्यावर आ. दादा भुसेंनी टाकली धाड

मालेगाव (प्रतिनिधी):-आमदार दादा भुसे दौर्‍यावर असताना अचानक जुगार अड्ड्यावर धाड टाकली. आमदार आल्याचे पाहताच जुगार खेळणार्‍या सर्वांचेच धाबे दणाणले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव जुगार खेळणार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

आमदार दादा भुसे हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर जिल्हाभरात चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालेगाव दौरा झाल्यानंतर भुसे हे सध्या मतदारसंघात पाहणी करत आहेत. अशातच ते काटवन भागाच्या दौर्‍यावर गेले असता परत येताना वडनेर गावातील बाजारपेठेतील मोसम नदीकाठी झाडा झुडपांमध्ये काही तरुणांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. आमदार भुसे यांनी गाडी फिरवत थेट जुगार अड्ड्यावर गेले. याचवेळी उपस्थित जुगार खेळणार्‍यांची चांगलीच पळापळ झाली.

यावेळी इतर जुगार खेळणारे पळाले, मात्र एकजण सापडल्याने त्याची विचारपूस केली. हे गाव वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने लागलीच राजरोसपणे सुरु असलेल्या अंक आकडयांच्या जुगार अड्ड्याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भुसे यांनी पोलीस अधिकार्‍यांवर प्रश्‍नांची सरबत्ती करत खडे बोल सुनावले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले.

या प्रकरणी अड्डाचालक भारत येवला, भाईदास मोरे, देविदास मोरे, अनिल मोरे, मनोहर मोहिते, यांच्यासह एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना अटकही करण्यात आली आहे. संशयितांकडून रोख रक्कम, पाच दुचाकी, तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यातही भुसे यांनी झोडगे येथे जुगार अड्ड्यावर कारवाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!