कॉमर्स : संधीचे महासागर

नुकतेच दहावी, बारावीचे निकाल लागले असून कॉमर्स शाखेत विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत याविषयी प्रा. अतुल आचळे (आचलिया) यांनी केलेले मार्गदर्शन.

सुमारे 10 ते 15 वर्षांपूर्वी इ 10 बोर्ड परीक्षेत 70 टक्के मिळवणारा विद्यार्थी हा हुशार म्हणून गणला जात असे, साहजिकच 85% किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजेच 90%, 95% मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असायची व ते विद्यार्थी असामान्य हुशार या पंक्तीत गणले जात असे. परंतु मागील काही वर्षांपासून बोर्ड परीक्षांचे निकाल बघुन हे नक्‍कीच अधोरेखित होते की ही नवीन मुले, मुली ही आधीच्यापेक्षा शैक्षणिक व इतर बाबतीत नक्‍कीच उजवे आहेत. व हुषार व असामान्य हुशार या विद्यार्थ्यांची संख्या अफाट झालेली आहे. या शैक्षणिक हुषारी बरोबरच विद्यार्थ्यांच्या स्वतःच्याकडुन व त्याच प्रमाणे पालकांच्या ही यांच्याकडून उच्च शिक्षणाच्या व उज्वल करीअरच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु खरी मेख इथेच आहे, बघायला गेलो तर उज्वल करीअरचे अनेक पारंपरिक व नवनवीन पर्याय उपलब्ध असल्याने गोंधळाची परिस्थिती या पालक व विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेली दिसते आहे.

तर आज आपण या लेखामध्ये करीअरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण व प्रचंड मागणी असलेल्या कॉमर्स ( वाणिज्य) शाखेतील पर्याय बघु या. कॉमर्स म्हटले की संधीचा महासागर असे ही म्हटले जाते व पुढील काही महत्त्वपूर्ण कोर्सेस/पदवी आपल्या समोर येतात.
चार्टर्ड अकौंटट (सनदी लेखापाल) : – या पदवीला कॉमर्स क्षेत्रातील सर्वोच्च पदवी म्हटल्यास काही चुकीचे ठरणार नाही. ही पदवी असलेल्यांना अनेक क्षेत्रात सर्वोत्तम संधी उपलब्ध आहेत, जसे स्वतःचे ऑफीस सुरु करुन सी.ए. ची खाजगी प्रॅक्टिस करता येते. त्याच प्रमाणे कंपनी , इरपज्ञ, विमा कंपनी व इतर आस्थापनांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी उपलब्ध आहे. तसेच आर्थिक सल्लागार, गुंतवणूक सल्लागार व इतर अनेक क्षेत्रात आकर्षक व सन्मानपुर्वक अशा संधी उपलब्ध आहेत. इ 12 वी नंतर – फाऊंडेशन, आयसीसी, फायनल या तीन परीक्षा व आर्टिकलशीप मिळुन 5 वर्षाचा हा कोर्स मान, सन्मान व आर्थिक स्थैर्य देण्यात सक्षम आहे.

सी.एस – कंपनी सेक्रेटरी :- नावाप्रमाणेच काही सूक्ष्म किंवा अति मध्यम स्वरुपातील कंपनी (संस्था) सोडुन इतर जवळपास सर्वच कंपनीमध्ये पूर्ण वेळ सेक्रेटरी (चिटणीस) ची नेमणूक ही बंधनकारक आहे. अतिशय मानाची व आर्थिक दृष्टिकोनातून ही अतिशय सुंदर अशा संधी इथे ही उपलब्ध आहेत. इ. 12 वी नंतर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या कोर्सला प्रवेश घेता येतो.

सी. एम. ए (कॉस्ट अ‍ॅन्ड मॅनेजमेंट अकौंटन्ट) :- औद्योगिकीकरण जितक्या झपाट्याने वाढत आहे व या पुढेही वाढेल, त्याचप्रमाणात या पदवीची मागणी सुद्धा त्याच प्रमाणात वाढणार, यात कुठलीही शंका नाही.
सीएमए, कॉस्ट अकाऊटंट, चीफ फायनान्शिअल ऑफीसर, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफीसर, फायनाशिअल अ‍ॅनालिस्ट या व यासारख्या महत्त्वपूर्ण पदावर नौकरी मिळते. किंवा स्वतःची खाजगी प्रॅक्टिस करता येते. इ 12 वी नंतर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करुन या कोर्स ला प्रवेश घेता येतो.

एम.बी .ए. (मास्टर इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) :- बिझनेस मॅनेंजमेंट अर्थात व्यवसाय व्यवस्थापन व प्रशासन या क्षेत्रात प्रचंड मागणी असलेला हा कोर्स आहे. कुठल्याही शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केलेला विद्यार्थी हा कोर्स करण्यास पात्र आहे. पदवीनंतर दोन वर्षे कालावधीचा हा कोर्स आहे. या कोर्समध्ये पुढील विविध विषयांमध्ये स्पेशलायझेशन करण्याची व्यवस्था आहे, जसे – मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्स, मिडीया मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट, डिजीटल मार्केटिंग, लॉजिस्टीक व सप्लाय चेन मॅनेजमेंट व इतर अनेक.

एम. कॉम : इ 12 वी नंतर तीन वर्षे पदवी चे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढे दोन वर्षांत पदव्युत्तर शिक्षण घेऊन मास्टर्स ही पदवी घेता येते.

डी. टी. एल : डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ. बिझनेस मध्ये असणार्‍या विविध कर प्रणालीमध्ये विशेष रस असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला पर्याय म्हणता येईल. पदवीनंतर एक वर्षाचा कर प्रणाली बद्दल सखोल ज्ञान देणारा हा कोर्स आहे.

एल. एल. बी :- सोप्या भाषेत वकील. इ 12 वी नंतर 5 वर्षाचा हा कोर्स, भारतीय कायद्याचे सखोल ज्ञान देत तुम्हाला कायदे तज्ञ म्हणुन करीअर करण्याची संधी देते. इ 12 वीच्या ऐवजी अन्य कोणतीही पदवी घेऊन नंतर थेट हा 3 वर्षाचा कोर्स करुन पदवी मिळविता येते.

एच. एम. सी. टी. : – हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी- इ 12 वी नंतर सरासरी 4 वर्षांचा हा कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅालिटी मॅनेजमेंटमध्ये किंवा एकंदरीतच केटरिंगमध्ये विशेष प्रावीण्य व रस असणार्‍या विद्यार्थ्यांसमोर हा करीअरचा एक चांगला पर्याय आहे. एकंदरीतच वाढत्या पर्यटन क्षेत्रात या विद्यार्थ्यांना चांगलीच मागणी असते.

बी.एम. एस.: बॅचलर इन मॅनेजमेंट सायन्स – मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू व इतर मोठ्या शहरातील मोठ मोठ्या कॉलेजेसने हा कोर्स उपलब्ध केला आहे. इ 12 वी नंतर 3 वर्षाच्या ह्या पदवीला चांगलीच मागणी आहे. पदवीनंतर या मध्येच एम.एम.एस ही मास्टर्स डिग्री सुद्धा उपलब्ध आहे.

डिप्लोमा इन इम्पोर्ट / एक्स्पोर्ट :– वाढत्या जागतिकीकरणामुळे व्यवसायाला भौगोलिक मर्यादा आता राहिलेल्या नाहीत. त्यामुळे एका देशातील माल जगातील कुठल्याही देशात आता विकला जातो. त्यासाठीचे आवश्यक व सखोल ज्ञान या कोर्समधून मिळवून एक चांगले करीअर बनविण्याची संधी उपलब्ध आहे.

डिजीटल मार्केटिंग :- इंटरनेट व त्या पाठोपाठ आलेले व जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले समाज माध्यम ( सोशल मिडीया ) या मुळे पारंपरिक शिक्षणाला फाटा देऊन हे नवीन क्षेत्र आजच्या पिढीला करीअरसाठी नविन राजमार्ग दाखवत आहे. कुठलाही व्यवसाय करायचा म्हणजे व्यवसायाची व मालाची जाहिरात ही आवश्यक असते. जाहिरात करण्याचे पारंपरिक मार्ग आता बदलले असुन डिजीटल माध्यमातून जाहिरात करण्याकडे जास्त कल दिसून येत आहे.

बी.बी.ए. (बॅचलर इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)- इ.12 वी नंतर बी.कॉम न करता 3 वर्षांत बी.बी.ए. ह्या पदवीचा विचार करायला हरकत नाही. Data Science : – Computer / Internet या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी असलेला हा कोर्स आता बी.कॉमच्या विद्यार्थ्यांदेखील उपयुक्‍त आहे. आता अतिशय चांगला असा पर्याय नवीन तंत्रज्ञानाने हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. Data is a New Oil असेही आज काल म्हटले जाते, यावरुन या क्षेत्राचे महत्व अधोरेखित होते.

Actuarial Science (विमा विज्ञान) :- विमा कंपनी (या मध्येLife Insurance Comapny, Accident Insurance, Travel Insurance व इतर अनेक क्षेत्रात अतिशय जास्त मागणी असलेला हा कोर्स आहे.

स्पर्धा परीक्षा :- विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करुन व त्या उत्तीर्ण करुन सरकारी नौकरी हा अतिशय सुंदर व राजमार्ग उपलब्ध आहे. ज्यामध्ये Banking व इतर Competitive Exams यांचा समावेश आहे.

याच बरोबर, सी.एफ.ए., सी.एफ. पी, डी.एल.डब्ल्यू, एल.एल.डब्ल्यू, एल.एल.एम., डी.बी.एम,. एम.पी.एम., एम.एम.एम., डी.एफ.एम. व इतरही अनेक पर्याय कॉमर्स क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. आपापल्या आवडीनुसार व भविष्यातील संधीचा विचार करुन योग्य तो पर्याय निवडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विद्यार्थी व पालकांनी कॉमर्स क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने करणे आवश्यक आहे.

– प्रा. अतुल आचळे (आचलिया)
संपर्क – 9822 625 925
(लेखक हे कॉमर्स क्षेत्रातील शिक्षक व करीअर कौन्सिलर आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!