चरस बाळगल्याप्रकरणी नाशिकच्या तिघांना 10 वर्षे सक्तमजुरी

नाशिक (प्रतिनिधी) :- चरस बाळगल्याप्रकरणी तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश वर्धन देसाई यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

निखिल ऊर्फ सनी सुरेश गायकवाड, इलियाज महमूद शेख, चंद्रशेखर सुखदेव शेरेकर असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पंचवटी पोलिसांनी 6 डिसेंबर 2011 मध्यरात्री रासबिहारी ते मेरी लिंक रोडवर सापळा रचला होता. सव्वाच्या सुमारास रमाकांत चुनीलाल बडगुजर यांच्या बंगल्याजवळ पजेरो गाडी (एमएच 04, बीएच 8008) दुसर्या वाहनाला (केएम 20, एम-1737) टोचन करून घेऊन जाताना पोलिसांना आढळले होते. पोलिसांनी पजेरो गाडीची तपासणी केली असता 13 लाख 80 हजार रुपये किमतीचा 6 किलो 900 ग्रॅम चरस विक्री करण्याच्या हेतूने शहरात घेऊन चालल्याचे आढळले होते. गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी पुरावे गोळा केले. संशयितांविरुद्ध न्यायालयात सन 2013 मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या खटल्यात पोलिस निरीक्षक महाजन, संजय सानप, अमोल रिकामे, संजय साठे, रंजन बेंडाळे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील डॉ. सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!