आता बिल्डरच्याच कार्यालयातून करता येणार मालमत्तेची नोंदणी

नाशिक – नविन मालमत्ता विकत घेतल्यानंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज राहणार नसून हि नोंदणी ग्राहकांना आता बिल्डरच्याच कार्यालयात करता येणार असल्याचे प्रतिपादन क्रेङाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले. अशी सेवा मिळणारे नाशिक हे राज्यातील तिसरे शहर ठरले असून याआधी मुंबई व पुण्यामध्ये हि सेवा ग्राहकांना मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, नोंदणी प्रक्रियेमध्ये निरंतर सुधारणा होत असून २००२ च्या आधी हि प्रक्रिया पूर्णपणे मॅन्युअल होती त्यानंतर या प्रक्रियेचे पूर्णपणे संगणकीकरण करण्यात आले. आज सुरू करण्यात आलेली ई-रजिस्ट्रेशन सेवा या नोदणी प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा ठरणार असून यामुळे ग्राहकांना नोंदणी साठी ताटकळत राहण्याची गरज राहणार नाही. दिवसेंदिवस शहरे विस्तारित होत असून नवनवीन प्रकल्पात नोंदणी करण्यासाठी वाढीव इन्फ्रास्ट्रक्चरची गरज यामुळे पूर्ण होणार आहे. आता ग्राहकांना कोणत्याही दिवशी म्हणजे अगदी सुट्टीच्या दिवशी देखील कोणत्याही वेळी हि नोंदणी करणे शक्य होणार आहे.

हि सेवा देण्यासाठी ज्याच्या प्रकल्पामध्ये ५० हून अधिक युनिट (फ्लॅट, प्लॉट, दुकान, ऑफिसेस) आहेत अश्या बांधकाम व्यावसायिकाने यासेवेसाठी राज्य शासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत प्रकल्पातील ग्राहकांना हा लाभ घेता येईल असेही रवी महाजन यांनी नमूद केले.

या सेवेच्या प्रशिक्षणासाठी आज नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे आणि सहजिल्हा निबंधक, मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक तसेच क्रेडाई नाशिक मेट्रो च्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुण्याचे श्रवण हार्डीकर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमध्ये बोलतांना मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे म्हणाले की, महाराष्ट्र शासनातर्फे ई – रजिस्ट्रेशन सुविधा नाशिकमध्ये सुरु झाली असून यामुळे बांधकाम व्यावसायिक मालमत्तेची विक्री पश्चात नोंदणी त्याच्याच कार्यालयात करू शकतो. या सुविधेचा लाभ ग्राहकांना होणार आहे तसेच या मुळे व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येऊन गैरव्यवहार देखील टाळता येणे शक्य होणार आहेत. ही सुविधा सुलभ प्रकारे राबविण्यासाठी हे प्रशिक्षण निशितच लाभदायक ठरेल असा विश्वास हि त्यांनी व्यक्त केला तसेच या सुविधेसाठी अधिकाधिक बांधकाम व्यवसायिकांनी शासनाकडे नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी उपस्थित क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल म्हणाले की, शासनाच्या या सेवेसाठी क्रेडाई महाराष्ट्रातर्फे पाठपुरावा करण्यात आला होता. आगामी काळात हि सेवा राज्यातील अन्य शहरात देखील उपलब्ध होणार असून अशाच प्रशिक्षण कार्यशाळेचे देखील राज्यातील विविध शहरात आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेसाठी नाशिक मधील १२५ बांधकाम व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी, क्रेडाईचे मानद सचिव गौरव ठक्कर, कार्यशाळेचे समन्वयक अतुल शिंदे, अनिल आहेर ,सागर शहा तसेच क्रेडाई मॅनेजिंग कमिटी सदस्य उपस्थित होते. नरेंद्र कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

एक दृष्टीक्षेप –

१. कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी बिल्डरच्याच कार्यालयात करता येणार नोंदणी
२. यामुळे नाशिक तसेच नाशिक बाहेरील नागरिकांची होणार सोय
३. गर्दीमध्ये ताटकळत राहण्याची गरज नाही. वेळेची होणार बचत.
४. नाशिक मधील ५० प्रकल्पांची पहिल्या टप्प्यात नोंदणी
५. नाशिक हे राज्यातील तिसरे शहर
६. दुय्यम सहनिबंधक कार्यालयावरील ताण होणार कमी.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!