नाशिक (प्रतिनिधी) :- ठक्कर बझार येथे संशयितावर सापळा रचून त्यास ताब्यात घेतले असता तो सराईत वाहनचोर निघाला. भागवत संजय सानप (वय 27, रा. गंगापूर गाव) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी सात स्प्लेंडर मोटारसायकली, दोन अॅक्टिव्हा आणि एक अन्य मोपेड अशा सुमारे 4 लाख 55 हजार रुपये किमतीची दहा दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

त्याच्याकडून नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांत नोंद असलेल्या चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे, तर एक मोटारसायकल त्याने भिवंडी हद्दीतील कोनगाव हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत गुन्हे शाखा युनिट-1 च्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार या पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांना ठक्कर बझार येथे मोटारसायकल पार्किंगच्या परिसरात एक इसम संशयितरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. ही माहिती त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली. यानंतर ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिनेश खैरनार, अंमलदार प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे, संदीप भांड व प्रवीण वाघमारे यांच्या पथकाने ठक्कर बझार येथील पार्किंगच्या परिसरात सापळा रचला. यावेळी एक व्यक्ती स्प्लेंडर मोटारसायकलीजवळ येऊन उभा असलेला दिसला. त्याचे निरीक्षण केले असता तो भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील एका वाहनचोरीच्या प्रकरणातील संशयित असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यास स्प्लेंडर मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. पुढील चौकशीत तो अट्टल मोटारसायकलचोर असल्याचे स्पष्ट झाले. त्याने भद्रकाली, उपनगर व नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकली व वाहने चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार त्याच्याकडून सात सिलिंडर, दोन अॅक्टिव्हा व एक मोपेड अशी 4 लाख 55 हजार रुपये किमतीची दहा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार, पोलीस अंमलदार काळू बेंडकुळे, वसंत पांडव, येवाजी महाले, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, नीलेश पवार, चंद्रकांत म्हसदे, आसिफ तांबोळी, महेश साळुंके, संदीप भांड, कविश्वर खराटे, योगीराज गायकवाड, मुक्तार शेख, गणेश वडजे, गौरव खांडरे, किरण शिरसाठ, अण्णासाहेब गुंजाळ, समाधान पवार आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.