नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक शहरात पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यासह विविध पाच ठिकाणी चंदनाच्या झाडाचे खोड चोरी करणार्या भोकरदन (जि. जालना) येथील चंदनचोरास पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस महानिरीक्षकांच्या गडकरी चौकाजवळील गोदावरी बंगल्याच्या भिंतीवरून उडी मारून अज्ञात चोरट्याने दि. 16 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास चंदनाच्या झाडाचे खोड कापून नेले होते. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-1 चे पथक तपास करीत असता संबंधित आरोपी जावेदखाँ अजिजखाँ पठाण (रा. कटोरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना) हा असल्याचे समजल्यावरून त्याच्या मागावर गुन्हे शाखा युनिट-1 चे पथक गेले होते. पोलिसांचा संशय येताच तो पळू लागला. त्याचा तब्बल सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग करून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याची अधिक चौकशी करता त्याने नाशिकमध्ये आणखी चार ठिकाणी चंदनाच्या झाडाच्या खोडाची चोरी केल्याचे दिसून आले. त्यात भा. दं. वि. कलम 379, 427 व 34 प्रमाणे सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हे, तर भद्रकाली व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. त्याच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असून, आरोपी जावेदखाँ पठाण यास भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. उगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, चालक हवालदार नाझिम पठाण, पोलीस नाईक विशाल देवरे, महेश साळुंके, प्रवीण वाघमारे व कविश्वर खराटे यांच्या पथकाने खासगी वाहनाने कटोरा बाजार येथे जाऊन त्याचा तपास केला व स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यास अटक केली.