पोलिसावर हल्ला करणार्‍या आरोपीस कारावास

नाशिक (प्रतिनिधी) :- पोलिसावर चॉपरने हल्ला करून शासकीय कामकाजात अडथळा आणणार्‍या विनोद निवृत्ती आगळे (वय 40, रा. आगळे चाळ, रामालयम् हॉस्पिटलजवळ, पंचवटी) यास कोर्टाने तीन महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी, की पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक माधव शंकर सांगळे व आहेर हे दि. 28 नोव्हेंबर 2018 रोजी मनपा शाळा क्रमांक 10 मध्ये कर्तव्यावर असताना विनोद आगळे याने त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला. यावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खटला दाखल करून कोर्टात पाठविला.

या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 5 चे न्या. आर. आर. राठी यांच्यासमोर चालले. त्यांनी परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून भा. दं. वि. कलम 353 अन्वये तीन महिन्यांचा साधा कारावास व पाचशे रुपये दंड, भा. दं. वि. कलम 332 अन्वये तीन महिन्यांचा साधा कारावास व पाचशे रुपयांचा दंड यासह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. योगेश डी. कापसे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!