मंत्रीपदासाठी 100 कोटींच्या मागणी प्रकरणी 5व्या आरोपीला अटक

मुंबई : राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील आमदाराकडे 100 कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतील एका आरोपीला काल अटक केली.

ही या प्रकरणातील पाचवी अटक आहे. आरोपींनी अनेक आमदारांना मंत्रीपदासाठी संपर्क साधला होता. रक्कम अधिक असल्यामुळे अनेकांनी प्राथमिक बैठकीनंतर नकार दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

नंदकिशोर प्रसाद ऊर्फ एन. के. सिंह असे अटक आरोपीचे नाव आहे. तो दिल्लीतील उत्तम नगर येथील भगवती गार्डन येथील रहिवासी आहे. त्याला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक दिल्लीत गेले होते. पण तो तेथे उपस्थित नव्हता. अखेर 25 जुलै रोजी आरोपी झारखंड येथील बोकारो येथील हॉटेल आदित्य इंटरनॅशनल येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून आरोपीला अटक करण्यात आली. सिंह यांच्याकडून पोलिसांनी दोन मोबाइल जप्त केले असून मोबाइलमध्ये संशयित व्हॉट्सअ‍ॅप चॅट सापडले आहेत. एन.के. सिंह हा या प्रकरणात अटक आरोपी जाफर उस्मानी याच्या संपर्कात होता. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. आरोपीचे वकील अजय उमापती दुबे यांनी आरोपींनी कोणतीही रक्कम घेतली नसल्यामुळे त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा होत नसल्याचे सांगितले. दरम्यान, याप्रकरणी आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सिंह याने दिल्लीतील उच्चपदस्थ व्यक्तींशी असलेल्या ओळखीद्वारे आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचे सांगितले होते. त्यानंतर याप्रकरणी रियाज शेखने काही आमदारांशी संपर्क साधून त्यांची भेट घेतली. यावेळी प्राथमिक बोलणे झाल्यानंतर रियाजने त्याचे साथीदार योगेश कुलकर्णी व सागर विकास संगवई यांना इच्छुक आमदारांची यादी पाठवली होती. त्यानंतर या दोघांनी ती यादी जाफरला पाठवली होती. जाफरने ती यादी पुढे एन.के. सिंह याला पाठवली. त्यानंतर सिंहच्या सांगण्यावरून आरोपी जाफरने संगवई याला आमदारांकडे ठरलेली रक्कम घेण्यास सांगितले. आरोपीने अनेकांकडे 100 कोटींची मागणी केली होती. ती रक्कम अधिक वाटल्यामुळे त्यातील बर्‍याच आमदारांनी नकार दिला. त्याच वेळी पुण्यातील आमदाराच्या खासगी सचिवाने आरोपी रियाजला ऑबेरॉय हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. तेथे साध्या वेशातील पोलिसांनी रियाजला ताब्यात घेतले आणि याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून रियाजला अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!