पेट्रोलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून कोयत्याने वार

नाशिक (प्रतिनिधी) :- पेट्रोल भरण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून दोन जणांवर कोयत्याने वार करणार्‍या दोनपैकी एका युवकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत राजीश गणपत जाधव (रा. पंचशीलनगर, गोरेवाडी, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की पीडित प्रवीण लहू बनसोडे (वय 23, रा. रामदास स्वामीनगर, उपनगर), संजय मनफुल रंजोलिया (वय 53, रा. शांतीनगर, गोरेवाडी, नाशिक) हे काल सायंकाळी साडेपाच वाजता इच्छामणी रोडवरील सुश्रूषा हॉस्पिटलसमोर उभे होते. त्यावेळी आरोपी वैभव बाबाजी पाटेकर (वय 19, रा. नारायण बापूनगर, जेलरोड) व बिट्टू सौदे (वय 20, पत्ता माहीत नाही) हे मोटारसायकलीने तेथे आले.

या दोघांनीही बनसोडे व रजोलिया यांच्याकडे पेट्रोलसाठी पैसे मागितले; मात्र पैसे देण्यास नकार दिला म्हणून पाटेकर व सौदे यांनी पीडितांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, तसेच दगडफेक करून मारहाण केली. वैभव पाटेकर याने कोयत्याने वार केला. तो हाताने अडविल्याने बनसोडे यांच्या तळहाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पाटेकर व सौदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून, पाटेकर याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!