जुने नाशिक मधील सराफाकडून ग्राहकाची 1.75 लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी) :- सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम घेऊन त्या बदल्यात सोन्याची चार तोळ्यांची पोत न देता ग्राहकांची पावणेदोन लाखांना फसवणूक करणार्‍या सराफाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी श्रीकृष्ण माधवराव कोरडे (वय 38, रा. श्री समर्थकृपा बंगला, वृंदावननगरी, हिरावाडी, नाशिक) यांना चार तोळे वजनाची सोन्याची पोत तयार करावयाची होती. त्यासाठी कोरडे यांनी जुने नाशिक येथील काझीपुरा चौकीच्या मागे असलेल्या संतोष ज्वेलर्सचे मालक संतोष प्रभाकर बेदरकर यांच्याकडे दि. 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता 21.07 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व फोन पेद्वारे 70 हजार रुपये दिले होते; मात्र सात महिने उलटूनही बेदरकर याने सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम घेऊनही त्या बदल्यात कोरडे यांना चार तोळे वजनाची सोन्याची पोत बनवून न देता एकूण 1 लाख 68 हजार 700 रुपयांची फसवणूक केली.

याबाबत कोरडे यांनी वारंवार बेदरकर याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यानंतर कोरडे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात सराफी व्यावसायिक संतोष बेदरकर याच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिडकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!