पंचवटीत पाच दुचाकींसह सायकल जळून खाक

नाशिक (प्रतिनिधी) :- काट्या मारुती पोलीस चौकीच्या मागील गुरुद्वाराशेजारी असलेल्या एका बिल्डिंगच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना आग लागून पाच दुचाकी व एक सायकल जळाल्याची घटना काल रात्री साडेअकरा वाजता घडली. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही; मात्र दुचाकी जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

या आगीत एमएच 15 एनटी 6078 या क्रमांकाची मोटारसायकल, एमएच 15 सीक्यू 5475 या क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा, एमएच 15 एफके 5811 या क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा, एमएच 15 ईआर 3525 या क्रमांकाची पॅशन प्रो, एमएच 15 एफएक्स 7869 या क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा अशा एकूण पाच दुचाकींसह एक सायकल जळून खाक झाली आहे. घटनेचे वृत्त कळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही.

काल रात्री गुरुद्वाराजवळ असलेल्या सीमा अपार्टमेंटच्या वाहनतळावर सदस्यांनी नेहमीप्रमाणे दुचाकी उभ्या केलेल्या होत्या. रात्री साडेअकरा वाजता बिल्डिंगच्या आवारातून धूर निघून काही तरी जळाल्याचा वास येऊ लागल्याने सदस्यांनी तत्काळ खाली धाव घेतली. यावेळी दुचाकी पेटलेल्या दिसल्या. नागरिकांनी तत्काळ पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र दुचाकींनी वेगाने पेट घेतल्याने पंचवटी अग्निशमन दलाला माहिती कळविली.

धूर जिन्यातून मोठ्या प्रमाणात वर गेल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ जणांना सुखरूप बाहेर काढले. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे मंगेश पिंपळे, नितीन म्हस्के, मनोज गायकवाड व वाहनचालक अशोक सरोदे यांनी परिश्रम घेतले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व्ही. पी. खाजेकर अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!