इगतपुरी – तालुक्यातील नांदगाव सदो येथील भूषण गणेश भागडे (वय २३) या बेपत्ता युवकाचा मृतदेह आज सकाळी समृद्धी महामार्ग भागातील एका विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे.
हा युवक १५ जानेवारीपासून बेपत्ता झाल्याबाबत इगतपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. नांदगाव सदो गावाजवळ एका विहिरीत हा युवक मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती इगतपुरी पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे. युवकाने आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी या घटनेबाबत इगतपुरी पोलिसांकडून सूक्ष्म तपास सुरु आहे. मजुरी कामाला जातो असे सांगून भूषण घरी परतला नाही म्हणून वडील गणेश पांडुरंग भागडे यांनी बेपत्ता झाल्याची खबर इगतपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच दिली आहे.
काही दिवसांपूर्वी भूषणचे लग्न जमले होते. मनमिळाऊ असणाऱ्या भूषणच्या बेपत्ता होण्यामुळे या भागातील नागरिक चिंतेत होते. आज त्याचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.