मनमाडजवळ धावत्या रेल्वेतून उडी मारलेल्या आरोपीचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) :- कांदिवली येथील गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीला उत्तरप्रदेशातून मुंबईत नेत असताना मनमाडजवळ त्याने धावत्या रेल्वेतून उडी मारली. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत कांदिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहन सुरेशराव कदम यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यात म्हटले, की मयत तबारक रयनी ऊर्फ चिन्हे (वय 40, रा. दरधावा ललिया, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) हा कांदिवली येथील दाखल एका गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

या आरोपीला आणण्यासाठी कदम यांच्या समवेत पोलीस पथक चिन्हे याला आणण्यासाठी ललिया येथे गेले होते. त्याला ताब्यात घेऊन पोलीस पथक पुष्पक एक्स्प्रेसने दि. 21 जुलै रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास मनमाड रेल्वे स्टेशननजीक आले असता आरोपी चिन्हे याने लघुशंकेचा बहाणा करून पोलीस अंमलदार केसरकर यांच्या हाताला झटका देऊन चालू रेल्वेतून उडी मारली. त्यामुळे त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!