नाशिक (प्रतिनिधी) :- शहरातील विविध भागांत तीन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंगाचा पहिला प्रकार पंचवटी परिसरात घडला. फिर्यादी महिला ही काल दुपारच्या सुमारास बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बसलेली होती. त्यावेळी त्यांच्या घरासमोर राहणार्या दोन आरोपींनी जुन्या भांडणाची कुरापत काढून जोरजोरात शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता दोघांपैकी एकाने महिलेला चापटीने मारहाण केली, तर आरोपीच्या मुलाने लाकडी दांड्याने पीडितेला मारहाण करून दुखापत केली. पीडितेने दोघांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अश्लील बोलून अंगास स्पर्श केला. त्यामुळे फिर्यादी यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न झाली, तसेच पीडितेच्या मुलास दोघा आरोपींनी आमच्या नादी लागू नका. नाही तर तुमचे घर संपवून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणी विनयभंग करणार्या दोघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार करीत आहेत.

विनयभंगाचा दुसरा प्रकार इंदिरानगर पोलीस ठाण्यात घडला. फिर्यादीची मुलगी ही अल्पवयीन असून, तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन एका युवकाने तिच्याशी ओळख वाढवून मैत्री केली, तसेच तिच्यासोबत सेल्फी फोटो घेऊन इन्स्टाग्राम व स्नॅपचॅट अॅपच्या माध्यमातून त्याच्या मोबाईल फोनवरून या मुलीचे फोटो फिर्यादी महिलेचे नातेवाईक व ओळखीच्या लोकांना पाठवून बदनामीच्या हेतूने प्रसारित केले, तसेच या फोटोंच्या आधारे अल्पवयीन मुलीशी मैत्री व संबंध ठेवण्यासाठी तिचा वेळोवेळी पाठलाग करून विनयभंग व लैंगिक फसवणूक केली. हा प्रकार दि. 13 मे 2020 ते दि. 13 मे 2022 यादरम्यान नाशिक येथे घडला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पुरुषाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वांजळे करीत आहेत.
विनयभंगाचा तिसरा प्रकार देवळाली कॅम्प परिसरात घडला. याबाबत पीडित महिलेने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की पीडित महिला ही रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपीने या पीडितेचे दोन्ही हात मागे पकडून पिळले, तसेच तिचे तोंड दाबून अंगाला स्पर्श केला व तेथून पळून गेला. नंतर आरोपीने या पीडितेला तिच्या घराजवळ गाठले. झाल्या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितले, तर तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी देऊन स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून पीडित महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.