नाशिक :- सन 2012 पासून आर्थिक डबघाईमुळे बंद पडलेल्या नाशिक साखर कारखान्याची चाके पुन्हा फिरण्यास सज्ज झाले आहेत.

नाशिकरोड येथील प्रथितयश बांधकाम व्यवसायिक व दीपक बिल्डर्सचे संचालक दीपक चंदे यांनी याकामी पुढाकार घेत आपल्या संस्थेची निविदा दाखल केली होती. या निविदेला काल एनडीसीसी बँकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. याबाबतचे पत्र बँकेने दीपक चंदे यांना बँकेचे प्रशासक अरुण कदम यांनी दिले आहे.

यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या 10 वर्षांत जिल्हा बँकेने 3 वेळा निविदा काढली होती. गेल्या 3 मार्च रोजी बँकेने पुन्हा निविदा प्रसिद्ध केली, तेव्हा दीपक बिल्डर्सने तांत्रिक व व्यावसायिक निविदा सादर केली. त्याला मंजुरी देत कारखाना ताब्यात घेण्यासाठी करार करून घ्यावा, अशा आशयाचे पत्र बँकेच्या वतीने चंदे यांना देण्यात आले.
यावेळी बँकेचे प्रशासक अरुण कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, प्राधिकृत अधिकारी दीपक पाटील आदी उपस्थित होते.
चारही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार
नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबक या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मा समजल्या जाणाऱ्या नासाका जवळपास एक दशकापासून बंद होते. आज दीपक बिल्डर्सच्या माध्यमातून या चारही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळाला आहे. सुमारे 17 ते 18 हजार सभासद असलेल्या शेतकऱ्यांना उदरनिर्वाहचा आधार मिळणार आहे.
– हेमंत गोडसे, खासदार
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा व कामगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही सहकार क्षेत्रात पाऊल टाकत आहोत. शिवजयंती व संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खा. हेमंत गोडसे यांचे स्वप्न पूर्ण होणार असून रोजगारासाठी मोठे प्रकल्प येणाऱ्या काळात टाकण्याचा मानस आहे. त्याचबरोबर आ. सरोजताई अहिरे यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले.
– दीपक चंदे,
संचालक, दीपक बिल्डर्स