नाशिक (प्रतिनिधी) :– सध्या सर्वत्र सायबर गुन्हे घडत असतानाच आता नाशिक महापालिका आयुक्तपदी नव्याने नियुक्त झालेल्या डॉ. चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या नावाने बोगस पद्धतीने महापालिका अधिकाऱ्यांकडूनच पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान याबाबत आयुक्तांनी हा सर्व प्रकार चुकीचा असून याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असल्याचे सांगितले आहे.
मनपा आयुक्तांच्या नावानं व्हाट्सअप वर एक फेक मेसेज फिरत आहे. या मेसेजच्या माध्यमातून रक्कम उकळण्याचा डाव सुरू झाल्याचे लक्षात आले आहे. आयुक्तांच्या नावाने बोगस खाते उघडून एका भामट्याने हा प्रकार सुरू करून महापालिकेतील अधिकाऱ्यांना त्याबाबतची लिंक पाठवली असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान याबाबत आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा सर्व चुकीचा आणि गैरप्रकार आहे याबाबत आपण पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिलेली आहे, त्याचबरोबर या लिंक वर कोणीही क्लिक करू नये असे आवाहनही त्यांनी नाशिककरांना केले आहे. विशेष म्हणजे या लिंक मध्ये डीपीवर आयुक्तांचा फोटो वापरण्यात आला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कुणीतरी भामटा माझ्या नावाने 9834246263 या नंबरवरून महापालिका अधिकाऱ्यांना व्हाट्सॲप मेसेज करून पाठविलेल्या लिंकवर पेमेंट करण्यास सांगतोय. त्याने माझा फोटो डिपी वर ठेवला आहे. मी पोलीस आयुक्तांकडे रीतसर तक्रार केलेलीच आहे.
अशा भामट्यांच्या मेसेजला बळी पडू नका. कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका.
-आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार